पुणे – पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत खासगी अनुदानित शाळांमधील बेकायदा शिक्षक भरतीप्रकरणी राज्य शासनाची परवानगी न घेता पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले होते. याप्रकरणी तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे तपासणी करून तत्कालीन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांवर शिस्तभंगाची कारवाईचे आदेश शासनाने शिक्षण आयुक्तांना दिले होते. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी केवळ चौकशी समिती नियुक्त करण्याचा वेळकाढूपणा केला जात आहे.
बेकायदा शिक्षक भरतीप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. त्यानुसार अधिकारी, मुख्याध्यापक, संचालक, शिक्षक संघटनेचे नेते, शिक्षक अशा एकूण 28 जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. तत्कालीन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शासनाची संमती न घेता परस्पर गुन्हे दाखल करण्याची परवानगी दिली होती. यामुळे संबंधित शिक्षण उपसंचालकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी दिले होते.
शिक्षण आयुक्त कार्यालयाने प्राथमिक शिक्षण संचालकांना सप्टेंबर 2021 मध्ये पत्र पाठवून चौकशी समिती नियुक्त करून अहवाल सादर करण्याचे आदेश बजाविले होते. त्यावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सुपे हे “टीईटी’ घोटाळ्यात अडकले.
आता प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी तत्कालीन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या परवानगीच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी नुकतीच नवी चौकशी समिती नियुक्त केली आहे. यात शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, देवादास कुलाळ, प्रशासन अधिकारी अमोल पवार यांचा समावेश आहे. या समितीला तीन आठवड्यात अहवाल सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.
मान्यता घेतल्याचे पत्रात नमूद
शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून भ्रष्टाचार कायद्यान्वये तपास करण्यासाठी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी शासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, शासनाने ही परवानगी नाकारली आहे. गुन्हा नोंद करण्यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्कालीन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांची मान्यता घेतल्याचे पोलिसांनी शासनाला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट नमूदही होते.