मंगळवारी सकाळी 11 वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोडत
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी (दि. 31) आरक्षण सोडत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणाचा अंतिम निर्णय न झाल्यामुळे ओबीसी आरक्षण वगळून सोडत काढण्यात येणार असल्याने या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले ओह. इच्छुकांमध्ये या आरक्षणाविषयी मोठी उत्सुकता अन् धाकधूकही पहावयास मिळत आहे. हक्काच्या जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यास आपल्यावर गंडांतर येण्याची भीती अनेकांमध्ये पहावयास मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्रभागरचना अंतिम केल्यानंतर आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण केली असून, ही सोडत मंगळवारी सकाळी 11 वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. एससी, एसटी आणि सर्वसाधारण गटातील महिलांच्या राखीव जागांबाबत ही सोडत होणार आहे.
महापालिकेची सदस्य संख्या 128 वरून वाढून ती 139 इतकी झाली आहे. तर प्रभागांची संख्या 46 इतकी आहे. महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असून 70 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे निम्म्या प्रभागांमध्ये महिलांसाठी दोन जागा तर निम्म्या प्रभागांमधील एक जागा महिलांसाठी राखीव असणार आहे. याशिवाय एससी गटासाठी 23 तर एसटीसाठी 3 जागा या आरक्षित असणार आहेत. एससी आणि एसटीच्या पुरुषाचे आरक्षण ज्या प्रभागात येणार त्या ठिकाणच्या दोन्ही सर्वसाधारण जागा या महिलांसाठी आरक्षित होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे एकूण 14 प्रभागांत सर्वसाधारण गटातील पुरुषांसमोर ही अडचण निर्माण होणार आहे.
त्यामुळे हे 14 प्रभाग कोणते ठरणार यावरच अनेकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. महापलिकेत वर्षानुवर्षे निवडून येणाऱ्या अनेकांनी या सोडतीची धास्ती घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीजणांनी आपल्या धर्मपत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली असली तरी अनेकजण मात्र स्वत: लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महापालिकेत वरिष्ठ समजले जाणाऱ्या काहीजणांना या आरक्षणाचा फटका बसू शकतो, अशी पालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आतापर्यंत लाखोंचा खर्च
महापालिका निवडणूक लढविण्याच्या हट्टाने मैदानात उतरलेल्या अनेकांनी आतापर्यंत लाखोंचा खर्च मतदारांवर केला आहे. आरक्षणाचा फटका आपल्याला बसणार नाही या विश्वासाने तयारी करणाऱ्या अनेकांनी आता मात्र आरक्षणाची धास्ती घेतल्याचे पहावयास मिळत आहे. आरक्षणाचे गंडांतर आल्यास हा सर्व खर्च वाया जाण्याचीही अनेकांना भीती आहे.
प्रभागरचनेवर राष्ट्रवादीचा वरचष्मा
राज्यात असलेल्या सत्तेचा प्रभागरचनेत राष्ट्रवादीला फायदा झाला आहे. आपल्या इच्छुकांना अपेक्षित प्रभागरचना करताना एससी आणि एसटीची संख्या ज्येष्ठांच्या प्रभागात कमी कशी राहील याची काळजी घेण्यात आली आहे. तर विरोधकांची अडचण कशी होईल, यावरही लक्ष दिल्यामुळे आरक्षण सोडतीचा सर्वाधिक धसका भाजपच्या इच्छुकांमध्ये दिसून येत आहे. आरक्षणाचा फटका बसलाच तर पक्षबदल करणे अथवा घरी बसणे हे दोनच पर्याय भाजपमधील काहीजणांसमोर राहू शकतात. त्यामुळे 31 तारखेच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा सर्वच प्रमुख पक्षांतील नेतेमंडळींना लागून राहिली आहे.