नगर – जिल्ह्यात आज पाच नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यात संगमनेरमधील चार व अकोले येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 266 वर पोहोचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात सहा जणांनी करोनावर मात केली. करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 119 झाली आहे.
मागील दोन-तीन दिवसांत नव्याने एकाही रुग्णाची भर पडली नव्हती. त्यामुळे दोन दिवस समाधान व्यक्त करण्यात येत होते. तथापि, आज करोनाची पुन्हा घोडदौड सुरू झाल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. काल सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आज सकाळी पुन्हा पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाचे टेंशन अजून वाढले आहे.
करोनामुळे नगर जिल्ह्यात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये संगमनेर सहा, निमोण दोन, निघोज, कोपरगाव, जामखेड, श्रीरामपूर, नगर, राशीन, निंबळक प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
आज सहा करोनामुक्त
जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे करोनामुक्त होणारांची संख्याही वाढत आहे. ती संख्याही समाधानकारक आहे. आज आणखी सहा जण करोनामुक्त झाले. त्यांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आज करोनामुक्त झालेल्यांमध्ये संगमनेर तीन, नगरमधील दोन, सुपा येथील एक रुग्णाचा समावेश आहे.