संगमनेर -तालुक्यात करोनाचे थैमान थांबण्याचे काही नाव घेईना! एखाद दोन दिवसांची विश्रांती घेऊन पुन्हा संगमनेर तालुक्यावर करोना हल्ला चढवत आहे. आज बाधित आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये सर्व महिला असून, त्यात निमोणमधील एका तेरा वर्षीय बालिकेचाही समावेश आहे, तर इंदिरानगर भागातही करोनाने आता शिरकाव केला असून, तेथील एका 57 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज एकाच वेळी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संगमनेरात खळबळ उडाली आहे. आजच्या रुग्ण वाढीने संगमनेर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्याही 89 वर जावून पोहोचली आहे. गेल्या 24 मेपासून एकसारखे रुग्ण सापडणाऱ्या संगमनेर तालुक्याला करोनापासून अद्यापही सुटका मिळाली नसल्याचे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या अहवालानुसार आज निमोणमधील एका तेरा वर्षीय बालिकेसह तीस व एकतीस वर्षीय महिलांना करोनाची लागण झाली आहे.
या महिला यापूर्वी बाधित आढळलेल्या सिन्नर तालुक्यातील दोडी येथील रुग्णाच्या संपर्कात आल्या होत्या. त्यातूनच एकाच घरातील त्या तिघींनाही करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी एकही रुग्ण नसलेल्या इंदिरानगर परिसरातील एका 57 वर्षीय महिला करोना संक्रमित झाली आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीला कोणाकडून संक्रमण झाले, याबाबतची कोणतीही माहिती नाही. आज एकाच दिवशी चार नवीन रुग्ण समोर आल्याने संगमनेर तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे.