धक्‍कादायक | खऱ्या मातेने लपवले; दुसरीने सांभाळले अन्‌ तिसरीने चोरले

अवघ्या चार महिन्यांच्या चिमुकलीच्या नशिबी आला धक्‍कादायक प्रवास, चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक

पिंपरी/ चाकण, दि. 24 (प्रतिनिधी) – खऱ्या मातेने जन्म देऊन लपवले, दुसरीने ते सांभाळले अन्‌ तिसरीने ते चोरले असा धक्‍कादायक प्रवास अवघ्या चार महिन्यांच्या चिमुरडीच्या नशिबी आला. पोलिसांनी कौशल्याने तपास केल्यामुळे ही चिमुकली सध्या पोलिसांच्याच ताब्यात आहे.

तिला सांभाळणाऱ्या मातेच्या घरातून चार महिन्यांच्या बाळाचे घरातून अपहरण केले. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी चाकण येथे मार्केट यार्डशेजारी घडली होती. याप्रकरणी चाकण पोलिसांनी महिलेला अटक केली आणि तिच्या ताब्यातून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर या घटनेचा आणखी एक भावनेचा पैलू समोर आला. बाळाला चोरणाऱ्या महिलेचा गर्भपात झाला असल्याने तो लपवण्यासाठी तिने बाळाचे अपहरण केल्याची धक्‍कादायक कबुली तिने पोलीस तपासात दिली.

राणी शिवाजी यादव (वय 28, रा. कुत्तर विहीर, ता. आंबेजोगाई, जि. बीड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. धनश्री राजेंद्र नागपुरे (वय चार महिने) असे अपहरण आणि सुटका झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत राजेंद्र प्रभाकर नागपुरे (वय 53, रा. वाफगावकर चाळ, मार्केटयार्ड शेजारी, चाकण) यांनी फिर्याद दिली होती. पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागपुरे राहत असलेल्या ठिकाणी एक तरुणी 17 फेब्रुवारी रोजी काम मिळविण्याच्या बहाण्याने आली. त्यानंतर तिने नागपुरे यांनी बेकायदा दत्तक घेतलेली मुलगी धनश्री हिचे अपहरण केले.

दरम्यान, चाकण पोलिसांना माहिती मिळाली की, अपहरण करणारी महिला बालाजीनगर, मेदनकरवाडी येथे गुन्हा घडण्यापूर्वी काही दिवस राहण्यास होती. मात्र, गुन्हा घडल्यापासून ती बेपत्ता आहे. पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरु केला. तिचे रेखाचित्र बनवून पोलिसांनी शोध घेतला. आरोपी राणी यादव हिला पोलिसांनी अंबेजोगाई, बीड येथून लहान मुलीसह ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने बाळाचे अपहरण केल्याचे सांगितले.

शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनीच्या संबंधातून हे बाळ जन्माला आले आहे. विवाहापूर्वी झालेल्या या चिमुकलीला खऱ्या आईने नागपुरे यांच्याकडे सांभाळ करण्यासाठी दिले. तर आरोपी राणी हिचा गर्भपात झाल्याने तिने या बाळाचे अपहरण करून ते बाळ आपलेच असल्याचे भासविले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ( Commissioner of Police Krishna Prakash ), अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, विजय जगदाळे आणि त्यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.