पुणे : पुण्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर काल रात्री हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी रात्रभर धरपकड करत पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर आता बंडखोर आमदारांच्या गाड्या फोडण्याची चिथावणीखोर भाषण देणारे हिंगोलीतील शिवसेना पदाधिकारी बबन थोरात यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री पुण्यात हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती. त्यानंतर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मध्यरात्री पुणे पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी पाच जणांना अटक केली.
दरम्यान, हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांना मुंबईतून रात्रीच्या सुमारास पुणे पोलिसांनी अटक केली. उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच संतप्त झाले. त्यांनी पुणे पोलिसांना हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबईतील काळाचौकी पोलीसांनी बबन थोरात यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. तोपर्यंत पुणे पोलिसांच पथक बबन थोरात यांचा ताबा घेण्यासाठी मुंबईत पोहचले होते. बबन थोरात यांना अटक करून पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले.