गोठ्याला आग; 29 जनावरांचा भाजून मृत्यू

संगमनेर तालुक्‍यातील अंभोरे येथील घटना ः दहा लाखांचे नुकसान
आग विझवताना कुटुंबीयही भाजले

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील अंभोरे येथील अंबादास काळ पाटील खेमनर यांच्या छपराच्या घराला व गायीच्या गोठ्याला आग लागून सुमारे 29 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. यात चार करडे, सहा शेळ्या, नऊ गायी, पाच कालवडी, पाच वासरांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी (दि. 22) साडेचार वाजता घडली. यात शेतकऱ्याचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले.

अंभोरे गावाच्या धरण परिसरातील दक्षिणेला रस्त्यालगत अंबादास खेमनर व मुलगा अण्णासाहेब व सून भारती यांच्यासह छपराच्या घरात राहत होते. मोलमजुरी व दुसऱ्याची शेती वाट्याने करून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत. दरम्यान, सोमवारी खेमनर कुटुंबीय दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करीत असताना अचानक त्यांच्या घरातून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. कडक उन्हामुळे या आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण करीत घराला वेढा देण्यास सुरुवात केली. यावेळी कुटुंबातील अण्णासाहेब व भारती यांनी प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना हाका मारण्यास सुरुवात केली. संसार आणि जनावरांना वाचविण्यात ते दोघेही भाजले. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तसेच साखर कारखान्याचे अग्निशमन दल तत्काळ हजर झाले.

जोपर्यंत अग्निशमन बंब येत होते, तोपर्यंत आगीच्या ज्वाळांमध्ये राहते घर, गोठा, अन्नधान्याची पोती, संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम, दागदागिने, टीव्ही, शालेय साहित्य, कागदपत्रे, दुचाकी, चाप कटर जळून खाक झाल्या. तसेच शेळ्या, गायी, कालवडी आदी 29 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी कामगार तलाठी विक्रम वतारी यांना दिली. त्यांनी तत्काळ पंचनामा केला. खेमनर कुटुंबीयांना शासनाकडून सर्वतोपरी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.