शांततेच्या वातावरणाला बोगस मतदानाचे गालबोट

मार्केटयार्ड पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हे : इतरत्र शांततेत पार पडली प्रक्रिया

पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदान शांततेत पार पडले. जिल्ह्याच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी जवळपास 11 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानादरम्यान दोन बोगस मतदाना व्यतिरीक्त कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी सकाळी 7 वाजता मतदान केले, यानंतर त्यांनी शहरातील बंदोबस्ताचा आढावा घेतला. मतदान शांततेत पार पडावे, यासाठी पाच प्रकारच्या क्विक रिप्सॉन्स टीमचे नियोजन करण्यात आले होते. मतदानानिमित्त पोलीस कर्मचारी सुमारे 36 तास कार्यरत होते. मतदान प्रक्रियेत नागरिकांना निर्भयपणे सहभागी होता यावे, यासाठी शहरातील 2,509 बुथसाठी 2 हजार 470 पोलीस कर्मचारी व 1540 होमगार्ड, प्रत्येक क्रिटीकल बुथसाठी एक पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या वाहनासोबत मिनी स्ट्रायकिंग टीम, क्राईम रिन्स्पॉन्स टीमची 30 पथके होती.

पुणे व बारामती लोकसभा मतदार संघातील मतपेट्या शिवाजीनगर गोडाऊन येथील स्ट्रॉंगरुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्रॉंग रुमच्या आतल्या बाजूला सीआरपीएफचे जवान, त्याबाहेर एसआरपीएफचे जवान आणि परिसराच्या बाहेरच्या बाजूला पुणे पोलिसांचा बंदोबस्त आहे.

शहरात मतदान शांततेत पार पाडले, कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहचेल अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नाही. पक्षाचे टेबल मतदान केंद्राबाहे 200 मिटरवर लावण्यावरुन काही ठिकाणी वाद झाला होता. मात्र, मतदान केंद्र प्रमुखांनी समजावल्यावर तो मिटला. पूर्वी ही मर्यादा 100 मीटर इतकी होती. मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दोन बोगस मतदाच्या तक्रारी दाखल झाल्या आहे. राज्य कामगार विमा महामंडळाच्या बुथवर हा प्रकार घडला. बाहेरुन मागवलेला बंदोबस्त तसेच होमगार्डचे जवान बुधवारी माघारी जाणार आहेत.
– मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा.


कसबा विधानसभा मतदार संघातील श्री शिवाजी मराठा महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात निवडणूक अधिकाऱ्याने “भाजपला मतदान करा,’ असे सांगितल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात पोलिसांकडे रात्री उशिरापर्यंत कोणही तक्रार दिली नाही. यासंदर्भातील कारवाईचा अधिकार निवडणूक आयोग यंत्रणेकडे आहे.
– राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.