पाटण -कराड- चिपळूण रस्त्यालगत असणाऱ्या “आपला बाजार’समोरील सुप्रिया शॉपी या दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून मोठे नुकसान झाले. मंगळवारी सकाळी 7 वाजता आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाला बोलावून आग आटोक्यात आणली.
मात्र, तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले होते. या आगीत साहित्य, फर्निचर, कोल्ड्रिंक साठवण्यासाठी असणारे फ्रीज व इतर साहित्य असे सुमारे 70 लाखाचे नुकसान झाले असल्याचे तलाठी जयेश शिरोडे यांनी पंचनाम्यात नमूद केले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सुप्रिया शॉपी या कोल्ड्रिंक व कपड्याच्या दुकानाला सकाळी आग लागली. शॉपीतून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच मालक सुधीर पाटणकर यांना फोनवरून कल्पना देण्यात आली. त्यांनी तात्काळ येथील खरेदी- विक्री संघाच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आग लागल्यानंतर तासाभरात दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते.
शॉपीत चार डीप फ्रिज, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, वॉटर बॉटल तसेच रेडिमेड कपडे मोठ्या प्रमाणात होते. या घटनेनंतर गाव कामगार तलाठी जयेश शिरोडे तसेच पाटण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दुकानाचे सुमारे 70 लाखाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. आग बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. या आगीत दुकानातले साहित्य बेचिराख होऊन अस्ताव्यस्त पडले होते.
डोळ्यात अश्रू
दुकानाला लागलेली आग व क्षणार्धात झालेले नुकसान पाहून दुकानाचे मालक सुधीर पाटणकर व कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. हे दृश्य इतके वेदनादायी होते की उपस्थितांची मने हेलावून गेली.
मोठी दुर्घटना टळली
दुकानाला लागलेली आग लक्षात येताच समयसूचकता दाखवून अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. मात्र, थोडा उशीर झाला असता तर दुकानावर असणाऱ्या इलक्ट्रिक व टायर दुकानासह पूर्ण इमारतीला आग लागून आणखी मोठे नुकसान झाले असते.