सातारा – तीन गावठी बनावटीचे पिस्तुले विकायला आलेल्या गजानन सखाराम मुजलादे (वय 55, रा. सिंगूर, ता. गोगावा, जि. खरगोण, मध्य प्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निंभोरे, ता. फलटण येथे जेरबंद केले. त्याच्याकडून दोन लाख 60 हजार रुपयांचे तीन पिस्तुले हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक जण गावठी बनावटीची पिस्तुले विकण्यासाठी पुणे-पंढरपूर मार्गावरील निंभोरे, ता. फलटण येथे सोमवारी (दि. 16) येणार आहे. या माहितीनुसार सर्जेराव पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले.
या पथकाने निंभोरे येथे सापळा लावला असता एक संशयित दिसला. त्याला थांबण्यास सांगितले असता, तो पळून जाऊ लागला. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी वैभव सावंत आणि गणेश कापरे यांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख 60 हजार रुपयांची एकूण तीन गावठी बनावटीची पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. त्याला पुढील कारवाईसाठी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. विलास नागे, ज्योतिराम बर्गे, विनोद गायकवाड, आनंदराव भोईटे, वैभव सावंत यांनी ही कारवाई केली.