मुंबई : मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील एका हॉटेलला आग लागल्याची घटना समोर आली आहे. हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली होती. दरम्यान, या हॉटेलमध्ये वास्तव्याला असणारे 30 डॉक्टर्स थोडक्यात बचावले आहेत. त्यांना या आगीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.
हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले सर्व डॉक्टर्स जेजे रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांचा उपचार करत होते. या सर्व डॉक्टरांना मरीन लाइन्स येथील धोबी तलाव परिसरातील फॉर्च्युन हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सर्व डॉक्टरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांना तत्काळ ट्रायडेंट हॉटेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या तत्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून अग्निशमन दलाच्या वतीने फायर कूलिंगचे काम सुरु आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे.