थिरूवनंतपूरम -देश-विदेशांतून घरवापसी करणाऱ्यामुंळे केरळमधील करोनाबाधितांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे करोना फैलाव रोखण्याबाबत भरीव कामगिरी करणाऱ्या केरळमधील बाधितांनीही हजारचा आकडा ओलांडला आहे.
केरळमध्ये बुधवारी 40 नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे त्या राज्यात करोना संसर्ग झालेल्यांची संख्या 1 हजार 3 इतकी झाली आहे. नव्या बाधितांमध्ये देशाच्या इतर राज्यांतून आणि परदेशांतून आलेल्या 37 जणांचा समावेश आहे. देशातील सर्वांत पहिले 3 करोनाबाधित केरळमध्ये आढळले होते. त्यानंतर सतर्क झालेल्या केरळने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या. त्यामुळे केरळने करोना फैलावावर लक्षणीय नियंत्रण मिळवल्याचे चित्र होते.
अशातच लॉकडाऊनमुळे देश-परदेशांत अडकलेल्यांना घरवापसीची परवानगी देण्यात आली. त्यामुळे केरळमध्ये परतणाऱ्यांचा ओघ वाढला. घरवापसी करणाऱ्यांमुळे त्या राज्यातील करोनाबाधितांची संख्याही वाढल्याचे दिसून येत आहे.
केरळमधील 552 बाधित आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. त्या राज्यातील मृतांची संख्या केवळ 6 आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असली तरी केरळमधील करोनाविषयक स्थिती अजूनही इतर अनेक राज्यांच्या तुलनेत दिलासादायी आहे.