नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो लोकांना प्राण गमवावा लागला आहे. आता कोरोना व्हायरस बधित पहिल्या रुग्णाची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण हा सध्या पूर्णपणे बरा झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या हा व्हायरस संपूर्ण जगात पोहोचला आहे. कोरोना व्हायरस बाधित पहिला रुग्ण ही एक महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला वुहानमध्ये झिंगा मासे विकण्याचे काम करत होती. ही महिला सध्या पूर्णपणे बरी झाली असल्याचेही म्हटले जात आहे.
अमेरिकेतील वृत्तपत्राच्या दाव्यानुसार चीनच्या वुहान शहरात राहात असलेल्या ५७ वर्षीय वेई गायक्सियन कोरोना व्हायरसच्या ‘पेशंट झिरो’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ही महिला अनेक दिवस रुग्णालयात दाखल होती. जानेवारी महिन्यात ही महिला पूर्णपणे ठीक झाली होती. वेई या हुन्नान प्रांतातील मच्छी मार्केटमध्ये झिंगे विकण्याचे काम करत होत्या. गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी वेई यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती.
वेई यांनी कोरोनाच्या संक्रमनाला साधारण आजार समजले होते. सुरुवातीला त्यांना सर्दी आणि ताप आला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र आराम न मिळाल्यामुळे त्यांनी वुहान येथील रुग्णालयात उपचार घेतले. तिथे त्यांच्या व्यतिरिक्त अनेक कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले होते. हे रुग्ण देखील हुन्नान येथील मच्छी मार्केटमध्ये काम करत होते. डिसेंबरच्या अखेरीस डॉक्टरांनी संबंधीत कोरोना व्हायरस रुग्णांना क्वारन्टाईन केले होते.
कोरोनाच्या झिरो पेशंटवरून याआधी वेगवेगळे दावे करण्यात आले होते. लेंसेट जनरलनुसार कोविड-१९ चा पहिला रुग्ण १ डिसेंबर २०१९ रोजी आढळून आला होता. सिडनी विद्यापीठाचे प्राध्यापक एडवर्ड होम्सनुसार पेशंट झिरोविषय़ी दावा करणे संभ्रमाचे आहे.