जयपूर – राजस्थानच्या मानगढ धाम येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेते व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज एका व्यासीठावर एकत्र आले. विशेष म्हणजे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या या दोन पक्षांच्या दोन नेत्यांनी परस्परांवर स्तुतिसुमने उधळली.
मोदी यांच्यासमोर केलेल्या भाषणात गेहलोत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांना तेथे अत्यंत आदराची वागणूक दिली जाते. ती यासाठी दिली जाते की त्यांना माहिती असते मोदी ज्या भारतातून आले आहेत तेथे गेल्या 75 वर्षांपासून लोकशाही आहे.
यावेळी गेहलोत यांनी राजस्थानातील आरोग्य सुविधांच्या मॉडेलचीही प्रशंसा केली व पंतप्रधानांनी ते एकदा पाहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जर पंतप्रधानांनी जर राजस्थानच्या या मॉडेलचा अभ्यास केला तर देशभरात हे मॉडेल लागू करतील असा दावाही गेहलोत यांनी केला.
गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा – अरविंद केजरीवालांची मागणी https://t.co/npLw2lKR2w
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 1, 2022
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा गेहलोत देशातील सगळ्यात ज्येष्ठ मुख्यमंत्री होते. आजही या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये ते सगळ्यांत ज्येष्ठ नेते आहेत. पूर्वी जेव्हा फिरण्यासाठी मी येथे यायचो तेव्हा येथे अगदी ओसाड जमीन होती. मात्र आता इथले सगळे रूपच बदलले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेलही यावेळी उपस्थित होते.