पुणे –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात गुरुवारपासून वाहतूक मार्ग बदलला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिशादर्शकांची उभारणी, लेन यंत्रणा आणि बॅरिकेडिंगचे काम बुधवारी रात्रीपर्यंत सुरू होते. तसेच ठिकठिकाणी पोलीस आणि मेट्रो कर्मचारी वाहतुकीचे नियमन करत आहेत. परिणामी, बुधवारी सायंकाळी येथील वाहतूक काहीशी सुसह्य झाली होती.
विद्यापीठ चौकात एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येथे वाहतूक मार्गांत काही बदल करण्यात आले आहेत. याची प्रायोगिक तपासणी गुरुवारपासून केली जाणार आहे. यासाठी वाहतूक विभागाने बाणेर रस्ता, पाषाण रस्ता या रस्त्यांवर दिशादर्शक फलकांची उभारणी, बॅरिकेडिंग केले आहे. बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी गणेशखिंड रस्त्यावर स्वतंत्र लेन करण्यात आली आहे.
असे असतील बदल
बाणेर-पाषाण- गणेशखिंड आणि इतर मार्गांवरील वाहतुकीत काही प्रमाणात बदल केले जात आहेत. यामध्ये एकेरी मार्ग, वाहनांची पार्किंग अथवा ते थांबविण्यास बंदी, ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी, मार्गांमध्ये अंशत: बदल अशा उपायांचा समावेश आहे.