आजपासून सुरू होणार कार्यवाही : राडारोडा संकलन केंद्रे तयार करणार
पुणे – बांधकाम, दुरुस्ती, विविध प्रकारची खोदाईची कामे यामुळे निर्माण होणाऱ्या राडारोड्याचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेली यंत्रणा अखेर या आठवड्यापासून सुरू होणार आहे.
क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी राडारोडा संकलन केंद्रे तयार करून त्यावर वाघोली येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये प्रक्रिया करणे तसेच उरूळी देवाची कचरा डेपोच्या ठिकाणी कचरा कॅपिंगसाठी वापरण्यात येणार आहे. जून 2019 मध्ये महापालिकेकडून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार होती. मात्र, संकलन केंद्र तसेच वाहतुकीसाठीच्या सुविधा नसल्याने ही योजना बारगळली होती. सोमवारपासून ती अखेर सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळल यांनी सांगितले.
महापालिकेचे विविध विभाग, एमएनजीएल, टेलिफोन कंपन्या, खासगी विकसक यांच्यामार्फत करण्यात येणारे बांधकाम, दुरुस्ती, विविध प्रकारची खोदाईमुळे मोठ्या प्रमाणात राडारोडा निर्माण होतो. निर्माण होणारा राडारोडा कुठे टाकावा, यासाठी पर्याय नसल्याने नागरिकांकडून तो ओढे, नाले, नदीकिनारी आणि मोकळ्या जागांवर टाकला जातो. या सर्व प्रकारच्या राडारोड्याचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यात राडारोडा वाहतूक करणे, राडारोड्यावर प्रक्रिया करणे, राडारोडा ठेवण्यासाठी जागा निश्चित करणे, संकलन करण्यात आलेला राडारोडा आवश्यकतेनुसार भू भरावासाठी आणि खाणीचा भाग समतल करण्यासाठी वापरणे आदींचा समावेश आहे. महापालिका हद्दीतून राडारोडा संकलित करून त्याच्या वाहतुकीसाठी 19 रुपये प्रति मे.टन प्रति कि.मी. दर निश्चित केला आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे अंतराचे मोजमाप केले जाणार असल्याचे मोळक यांनी स्पष्ट केले.
क्षेत्रीय कार्यालयांमुळे रखडला होता प्रकल्प
महापालिकेने या राडारोड्याच्या संकलनाची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाकडे दिली होती. तसेच पालिकेच्या ऍमिनिटी स्पेसच्या ठिकाणी तो ठेवून नंतर त्याची वाहतूक करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांकडे देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही योजना बारगळली होती. मात्र, आता पुन्हा या जागा निश्चित केल्या असून सोमवारपासून ही यंत्रणा पालिकेकडून कार्यान्वित केली जाणार आहे.
टोल फ्री क्रमांक 1800-233-9595
वरील क्रमांकावर राडारोडा उचलण्यासाठी संपर्क करावा.