पैशांअभावी आईचे उपचार करता न आल्याची खंत
पुणे – दीपक सखाराम कुलकर्णी म्हणजे डीएसकेच्या विविध कंपन्यांमध्ये मोठ्या विश्वासाने एकाच कुटुंबातील चौघांनी गुंतवणूक केली. मात्र, याच कुटुंबातील 90 वर्षांच्या महिलेच्या उपचाराला देखील पुरेसे पैसे मिळले नसल्याची खंत या कुटुंबाने व्यक्त केली आहे.
डी. एस. कुलकर्णी हे आपले पैसे व्याजासहित परत देतील या आशेने या कुटुंबातील चार जणांनी तब्बल 17 लाख 66 हजार 109 रुपयांची गुंतवणूक डीएसकेच्या विविध कंपन्यांमध्ये केली होती. त्यातील कुटुंब प्रमुखाचे वय 67 वर्षे आहे. त्यांच्या नावाने 8 लाख रुपयांची गुंतवणूक होती. त्यांच्या 90 वर्षांच्या आईच्या नावाने 6 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. मुलाच्या आणि सुनेच्या नावावरही गुंतवणूक करण्यात आली होती. आपल्या सर्व कुटुंबीयांच्या मध्यम आणि दीर्घ पल्ल्यातील गरजा भागाव्यात, आईला मदत व्हावी असा, यामागे उद्देश होता असे त्यांनी म्हटले आहे.
या ज्येष्ठ नागरिकाची आणि त्याच्या कुटुंबीयांची सर्वच रक्कम अडकून पडलेली आहे. ते निवृत्त होऊन 6 वर्षे झाली आहेत. त्यांनी जन्मभराची कमाई यात गुंतविली होती. सुरुवातीला काही काळ या गुंतवणुकीवरील परतावा मिळत होता. मात्र, नंतर अचानक बंद झाला आणि अनेक वेळा चौकशी करूनही उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आता हे सर्व गुंतवणूकदार संघटनेच्या माध्यमातून आपली गुंतवणूक परत मिळविण्यासाठी विविध पर्यायावर विचार करीत आहेत.
पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा
डीएसकेमध्ये गुंतवणूक करून अडचणीत आलेले नागरिक सध्या पंतप्रधान कार्यालयाकडे “चैतन्य वाटिका ग्रुप’च्या माध्यमातून कैफियत मांडत आहेत. या कुटुंबानेही पत्र पाठवून पंतप्रधान कार्यालयाला आपल्या अडचणीची माहिती सांगितली आहे. तसेच यातून शक्य तितक्या लवकर मार्ग निघेल, असे काहीतरी करण्याची विनंती केली आहे.
नातेवाईकही मदत करत नाहीत
त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की “आमची आर्थिक परिस्थिती पाहून आता आम्हाला मित्र आणि नातेवाईक मदत करायला पुढे येत नाहीत. त्यामुळे आम्ही आता अत्यंत अडचणीत सापडलो आहोत. सुरुवातीच्या काळात या कुटुंबाने पोलिसांकडेही तक्रार दिली होती. मात्र, प्रकरणातील गुंतागुंत वाढलेली आहे. त्यामुळे आता या कुटुंबाला वाट पाहण्याशिवाय कसलाही पर्याय समोर दिसत नाही. ते पैसे मिळाले नाहीत, तर आमचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडण्याची भीती आहे.