शहरातील सर्व दुकाने, कार्यालये बंद ; पोलिसी खाक्याचा परिणाम
पिंपरी (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन वारंवार करण्यात येत होते. राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात रोज रुग्ण वाढत आहेत आणि दुसरीकडे नागरिकांकडून मात्र हवा तास प्रतिसाद मिळत नव्हता. रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली असली, तरी काही ठिकाणी नियमितपणे गर्दी होत होती. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवत किराणा दुकाने आणि मेडीकल वगळता सर्व कार्यालये आणि व्यवसाय पूर्णपणे बंद केले.
पिंपरी-चिंचवड शहराच्या आजवरच्या इतिहासात नागरिकांनी पहिल्यांदाच एक प्रकारचे “लॉकडाऊन’ अनुभवले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या दिलेल्या आदेशाचे पोलिसांनी आज शहरात काटेकोरपणे पालन करवून घेतले. शहरातील व उपनगरांमधील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये किराणा सामान, मेडीकल, दूध डेअरी आणि भाजी मंडई वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. दुकाने बंद करण्याबाबत जनजागृती करूनही दुकाने खुली ठेवणाऱ्या दुकानदारांवर गुरूवारी आणि शुक्रवारी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले.
दुकाने बंद करत असताना पोलिसांनी सर्व दुकानदारांना 31 मार्चपर्यंत दुकाने न उघडण्याची ताकीद दिली. काही ठिकाणी सकाळी उघडलेली दुकाने पोलिसांनी आणि महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने
बंद केली.
सकाळी नेहमीप्रमाणे व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडली होती. परंतु आधीपासूनच तयार असलेल्या पोलिसांनी अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण शहरातील दुकाने बंद करायला लावली. त्यानंतर काही वेळाने शहरातील बहुतेक रस्ते रिकामे झाले होते. किराणा दुकानदार, भाजी मंडई आदी ठिकाणी किराणा सामान, भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची तुरळक वर्दळ होती. त्या व्यतिरिक्त सर्व बाजारपेठेत शुकशुकाट होता. फूल विक्रेत्यांनी येथील फूलबाजार देखील आजपासून तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तथापि, काही काही फुल विक्रेत्यांचे स्टॉल सुरू होते. महापालिका अतिक्रमण विभागाने संबंधितांना संबंधित स्टॉल बंद करण्यास सांगितले. फुल विक्रेत्यांना याबाबत विचारणा केली असता आम्ही फक्त तुळशीची पाने विकत होतो. तुळस ही वनस्पती औषधी असल्याने सर्दी, खोकला आदींसाठी ही गुणकारी आहे. त्यामुळे केवळ त्यांची विक्री केली जात होती. तथापि, स्टॉल बंद करण्यास सांगितल्यानंतर आम्ही तत्काळ बंद केले.