नारायणगाव, वारुळवाडी हद्दीत लावला बिबट सूचना फलक
नारायणगाव – पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव व वारुळवाडी गावच्या हद्दीतील बाह्य वळण व मुख्य रस्त्यावर सोमवारी (दि. 22)वनविभागाच्या वतीने जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट सूचना फलक लावण्यात आले आहेत.
यावेळी वन विभागाच्या वतीने वनपाल नितीन विधाटे, वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ, शिंदे मामा, वारुळवाडीचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी मदत केली.
नारायणगाव वारुळवाडी हद्दीतील महामार्गावर दीड वर्षात 7 बिबटे, 3 कोल्हे, 2 तरस असे वन्य प्राणी अज्ञात वाहनांच्या धडकेने मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. बिबट्यांच्या झालेल्या मृत्यूची घटना पाहता वाहन चालकांना माहितीसाठी महामार्गावर ठिकठिकाणी बिबट प्रवण क्षेत्राची माहिती मिळावी यासाठी सूचना लावण्यात आले आहेत.
वनविभागाचा वेळ काढू पणा
वनविभाग जुन्नर यांच्या वतीने नारायणगाव वारूळवाडी हद्दीतील बाह्यवळण रस्त्यावर बिबट प्रवण क्षेत्राचे सूचना फलक लावल्यामुळे वाहन चालकांना महामार्गावरुन बिबटे रस्ता ओलांडत असतात अशी माहिती मिळेल व बिबट्यांची मृत्यूची होणारी संख्या कमी होईल अशी आशा व्यक्त केली; परंतु महामार्गावर वाहनांचा वेग विचारात घेता वनविभागाने लावलेले बिबट मार्गदर्शक सूचनांचे फलक अतिशय लहान आहेत.
त्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकाच्या मार्गदर्शक फलक लक्षात येणार नाहीत. मार्गदर्शक सूचनांचे फलक मोठ्या आकाराचे व वाहन चालकाला सहज व स्पष्ट दिसतील असे असणे गरजेचे होते. परंतु वनविभागाने लहान आकाराचे मार्गदर्शक फलक लावून वेळकाढूपणा केला आहे. त्यामुळे महामार्गावर बिबट्यांच्या होणार्या मृत्यूला वनविभागाचे अधिकारी तितकेच जबाबदार असल्याचे प्राणी मित्र बोलत आहे.