भोर – सहकार कायद्याच्या अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ सोमवार (दि. 9) ऑक्टोबर 2023 च्या आदेशान्वये बरखास्त करण्यात आले असून, अखेर गुरुवारी (दि. 12) पतसंस्थेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती भोरचे सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी दिली.
भोर येथील नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात मंगळवारी (दि. 17) आयोजित पत्रकार परिषद आयोजित केली होत, यावेळी तावरे यांनी ही माहिती दिली. संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी बाळासाहेब तावरे यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांचे प्रशासक मंडळ गठित केले आहे. यात शांताराम वीर, आत्माराम गाडे हे दोन सदस्य आहेत. प्रशासक मंडळाने एक वर्षासाठी संचालक मंडळाची निवडणूक घेऊन नवीन संचालक मंडळ गठीत होईल याची दक्षता घ्यावी, असे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
संचालक मंडळ बरखास्त करण्यापूर्वी सुनावणी घेऊन संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमच्या सहकार कायद्याच्या आधिन न राहता संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही, लेखापरीक्षण करून घेतले नाही, लेखापरीक्षकाची नियुक्ती केली नाही, लेखापरीक्षणाचा अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल स्वीकृतीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत ठेवला नाही. या कामांमध्ये संस्थेने कसूर केले असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक एक वर्षासाठी संचालक मंडळ सदस्य म्हणून निवडले जाण्यास किंवा राहण्यास अपात्र राहतील, असे सांगितले.
याबाबत तावरे म्हणाले, संस्थेवर प्रशासकीय नेमणूक असल्याने कर्जदारांवर कर्ज वसुलीसाठी प्रकरण दाखल करण्याचे काम सुरू असून ठेवीदारांनी संस्थेत येऊन टाळेबंदी, संस्थेची फोडतोड, कर्मचाऱ्यांना त्रास असे प्रकार न करता संस्थेत प्रत्येक कर्जदारांच्या वसुलीतून ठेवीदारांची रक्कम देण्यात येईल. नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांची संघटना तयार केली असून, 30 नोव्हेंबरपर्यंत संस्थेचे ऑडिट पूर्ण झाल्यावर दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
हे संचालक मंडळ बरखास्त
अध्यक्ष भास्कर बाबुराव किंद्रे, उपाध्यक्ष सूर्यकांत बबन शिंदे, संचालक सदाशिव कृष्णा वरे,सुनील भिवाजी म्हस्के, विजय गोविंद खळदकर, रघुनाथ बाबुराव भोसले, श्रीधर रघुनाथ किंद्रे, अजित तुकाराम गायकवाड, उषा सुरेश तांगडे, छाया गोकुळ फणसे यांचे मंडळ बरखास्त करण्यात आले आहे, तर सचिव सोपान हरिभाऊ सावले यांच्यावर दंड आकारण्यात आला आहे.
पतसंस्थेच्या नेरे, भोर, धनकवडी, नसरापूर, वेल्हे येथे शाखा असून चार हजार सभासद आहेत. संस्थेच्या 35 कोटी 85 लाख 9 हजार 35 रुपये ठेवी असून एकूण कर्ज रक्कम 42 कोटी 83 लाख 38 हजार 884 रुपये (व्याज रक्कम सोडून) असून, 69 कोटी 82 लाख 9 हजार 849 फरक आहे. कर्जदारांनी संस्था बुडणार असा गैरसमज न करता आपले थकीत कर्ज भरावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.
– बाळासाहेब तावरे, सहायक निबंधक