राजगुरूनगर -शहरात एका 32 वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे, खेड पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. राजगुरूनगर शहरात पहिलाच करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेड तालुक्यात गुरुवारी (दि. 25) राजगुरूनगर शहर आणि कडाचीवाडीत प्रत्येकी एक रुग्ण सापडल्याने तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 58 जणांना करोनाची लागण झाली आहे. यातील 40 जणांनी करोनावर मात करीत घरी परतले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जणांवर उपचार (ऍक्टिव्ह) सुरू आहेत. यात चाकण 3, येलवाडी-4, नाणेकरवाडी 3, म्हाळुंगे, गोलेगाव, खराबवाडी प्रत्येकी एक, साकुर्डीतील एक प्रसूती झालेली महिला महाळुंगे इंगळे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे.
राजगुरूनरातील बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास प्रशासनाने सुरूवात केला असून कंटेन्मेंट झोन करण्याची तयारी सुरु केली आहे. कडाच्यावाडीतील रुग्णाच्या संपर्कात असलेल्या 17 जणांपैकी अनेकांना तपासणीपूर्वी तापाची लक्षणे दिसली आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. नगरपरिषद हद्द व कडाचीवाडी येथे रुग्ण आढळल्याने खेड प्रशासनाच्या वतीने परिसर सील केला आहे.
सर्व नगरपरिषद हद्दी बाधितांनी व्यापल्या
बाधितांमध्ये जिल्ह्यातील राजगुरूनगर नगरपरिषदेचा अपवाद होता. राजगुरूनगर परिषद हद्दीतही बाधित आढळल्याने आता सर्वच नगरपरिषद हद्दीत लागण झाली आहे.