…अखेर ‘गार्बेज फ्री पुणे’

स्वच्छ शहर स्पर्धेत सहभाग कायम : शहराला केंद्राकडून थ्री स्टार दर्जा

पुणे – केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धेसाठी शहराला “गार्बेज फ्री सिटी’ दर्जा मिळविण्यात अखेर महापालिकेस यश आले आहे. या स्पर्धेच्या 19 मे रोजी जाहीर झालेल्या निकालात महापालिकेस कोणताही दर्जा मिळालेला नव्हता. मात्र, पुण्याचे झालेले गुणांकन चुकले असल्याचे महापालिकेने केंद्राच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अखेर केंद्र शासनाने पुणे महापालिकेस “थ्री स्टार’ दर्जा जाहीर केला आहे. यामुळे स्वच्छ शहर  स्पर्धेत महापालिकेचा सहभाग कायम राहणार आहे.

केंद्र शासनाकडून “स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत देशातील स्वच्छ शहरांचे मानांकन जाहीर केले जाते. तीन वर्षांपासून पहिल्या दहा क्रमांकांमध्ये असलेले पुणे शहर मागील वर्षी या स्पर्धेत देशात 37 व्या क्रमांकावर गेले होते. त्यामुळे पालिकेने या वर्षी पुन्हा पहिल्या दहा शहरांमध्ये पुण्याचे नाव आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. या स्पर्धेत मानांकन मिळवायचे असल्यास महापालिकेस शहर स्वच्छतेचे स्टार रेटिंग करणे बंधनकारक आहे. त्यासाठी सेव्हन स्टार, फाईव्ह स्टार आणि थ्री स्टार अशाप्रकारचा दर्जा निश्‍चित केला आहे. त्यानुसार, महापालिकेने फाईव्ह स्टार दर्जा जाहीर केला होता. त्यानंतर केंद्राच्या पथकाने जानेवारीत शहरात येऊन या दर्जाच्या निकषांची तपासणी करून आपला निकाल जाहीर केला. त्यात महापालिकेस एक स्टारही मिळालेला नव्हता.

मात्र, महापालिकेने केंद्राने केलेल्या गुणांकणाची तपासणी केली असता, काही निकषांमध्ये पालिकेस गुणच देण्यात आले नसल्याचे तसेच काही ठिकाणी चुकाचे गुणांकन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पालिकेकडून 2 वेळा केंद्र शासनास पत्र पाठवून पालिकेच्या गुणांचे फेरमूल्यांकन करण्याचे तसेच काही ठिकाणी गुणच दिले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार केंद्राने नव्याने जाहीर केलेल्या सुधारित निकालात आता पालिकेस “3 स्टार गार्बेज फ्री सिटी’चा दर्जा प्राप्त झाला आहे. शहरातील नागरिकांसह महापालिकेकडून मागील वर्षभर प्रामाणिकपणे केलेल्या कामाची ही पावती असून स्वच्छ शहर स्पर्धेतही महापालिकेस चांगले मानांकन मिळेल, असा विश्‍वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्‍त केला.

महापालिकेचे स्वच्छ शहर स्पर्धेतील सहभाग कायम राहिला आहे. केंद्राकडून लवकरच या स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. केंद्राने जाहीर केलेल्या स्टार रेटिंगमध्ये 40 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पुण्यासह 9 शहरांना थ्री स्टार दर्जा मिळाला आहे.
– ज्ञानेश्‍वर मोळक,  घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.