नगर शहरातील बहुतांशी भागात शुकशुकाट
नालेगाव भागात आज आणखी बारा करोनाबाधित आढळले
नगर (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून नगर शहरात करोना रुग्ण वाढीचा आकडा वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यानुसार तोफखाना परिसर आणि सिद्धार्थनगर, नालेगाव भागात सर्वाधिक रुग्ण आढळ्याने महापालिकेने दोन्ही परिसर 10 जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या दोन्ही परिसरात कन्टोन्मेंट झोन जाहीर करून ये-जा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच आज शहरात पुन्हा 12 रुग्णांची भर पडली आहे.
दरम्यान, शहरातील रुग्ण वाढीची स्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरवात केली असून, कन्टोन्मेंट झोन जाहीर केलेल्या तोफखाना व सिद्धार्थनगर परिसरात पत्रे लावून परिसर सील करण्यात आला आहे. तसेच बहुतांशी भागात भाजी विक्रेत्यांसह दुकाने बंद करून व्यवहार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात शुकशुकाट दिसत होता. सिद्धार्थनगरमध्ये चार आणि तोफखाना परिसरात 7 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे या दोन्ही परिसर लॉक करण्यात आले आहेत.
नगर शहरातील नालेगाव भागातील वाघगल्ली येथे सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यात 42 वर्षीय महिला, 45 वर्षीय आणि 50 वर्षीय पुरुष तसेच 18 वर्षांच्या युवकाला बाधा झाल्याचे समोर आले. सायंकाळी सहा वाजता आलेल्या अहवालात पुन्हा आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे नगर शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 93 झाली आहे. बुधवारी शहरात तब्बल 18 करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तो परिसर नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे.
सिद्धार्थनगर परिसर सिद्धार्थनगर, सारडा कॉलेजची पाठीमागील बाजू, गोळीबार मैदान, दीपक मोहिते घर, गुरुकुल शिक्षण मंडळाच्या उत्तरेकडील बाजू, जाधव मळा, कवडेनगर, सारडा कॉलेज, असा सील करण्यात आला आहे. तोफखाना परिसर सिद्धिबाग कोपरा, तोफखाना, शितळा देवी मंदिर, लयचेट्टी यांचे घर, बागडे ज्वेलर्स, चितळे रोड, नेहरू मार्केट, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, दत्त मंदिर ते सिद्धिबाग कोपरा असा भाग सील केला आहे. तसेच दिल्लीगेट वेस, चौपाटी कारंजा, जाधव हॉस्पिटल, जनकल्याण रक्तपेढी, सजावट कारपेटवाला, गाडगीळ पटांगण, नेप्तनाका चौक, नालेगाव हडको, घोरपडे हॉस्पिटल हा परिसर कन्टोन्मेंट झोन घोषित केला आहे. रंगारगल्ली, आनंदीबाजार, गौरघुमट, धनगरगल्ली, पटवर्धन चौक, अमरधाम, दातरंगेमळा, बागरोजा हडको, सातभाईमळा, नीलक्रांती चौक हा बफर झोन म्हणून जाहीर केला आहे.