नागपूर – राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरमधील कोविड सेंटरला न्यायालयाच्या दणक्यानंतर अखेर राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
करोनाचा वाढत उद्रेक लक्षात घेता 1 हजार खाटांच्या कोविड-19 केअर सेंटरसाठी आदेश काढले आहेत. या सेंटरमध्ये 400 खाटा व्हेंटिलेटर तर 300 खाटा ऑक्सिजनच्या राहणार आहेत.
नागपुरात काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग वाढला आहे. नागपूरमधील करोनाबाधितांची संख्या 60 हजारांवर पोहोचली आहे. शहरात दररोज 50 ते 60 जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत.
ही परिस्थिती असताना सरकार रुग्णांसाठी कोव्हिड केअर सेंटर उभारत नसल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यामुळे सरकारने तत्काळ आदेश काढत शहरातील विभागीय क्रीडा संकुलमध्ये जम्बो कोव्हिड केअर सेंटर उभारण्याचे आदेश काढले आहेत.
या सेंटरचा करोना रुग्णांवर उपचारासाठी फायदा होणार आहे. तसेच रुग्णांना खासगी रुग्णालयात बेड मिळत नाही. बेड मिळाला तर अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात.
आता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने समन्वय समितीही स्थापन करण्यात आली आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी या समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत.