नापास विद्यार्थ्यांची परीक्षा महिनाभरात

औरंगाबाद – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लांबणीवर पडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल 10 ऑक्‍टोबरपासून लागण्यास सुरूवात होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही, असे स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

तसेच परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. सामंत म्हणाले, अंतिम वर्षात 1 लाख 16 हजार 400 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

त्यापैकी 90 ते 92 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेसाठी नोंद केली आहे. उरलेले विद्यार्थी आपल्या नजीकच्या केंद्रात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणार आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणाही सज्ज आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची काळजी घेणेही आवश्‍यक आहे. त्यामुळे सर्व विभागांनी एकत्र येऊन पोलीस विभागाला आणि महसूल विभागाला मदत करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना प्रश्नसंच, मॉक टेस्ट यानंतर काही कारणास्तव परीक्षा राहिल्या तर त्या तातडीने घेण्यात येतील. नापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीने महिन्याभरात घेतली जाईल आणि त्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही.

गेल्यावर्षीप्रमाणेच हे प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी मनात कोणताही संभ्रम ठेवू नये, असेही त्यांनी नमूद केले.

पदवी प्रमाणपत्रांचा आदर हा सर्व ठिकाणी पूर्वीप्रमाणेच करण्यात यावा. याकडे जर कोणती तसे बघत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.