पिंपरी – वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना आणि मेट्रोच्या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे हे उद्घाटन करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहरातून 3 हजार नागरिक तसेच लाभार्थी हजेरी लावणार आहेत, अशी माहिती भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली. शहरातील लाभार्थी होणार ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होणार असल्याची भावना जगताप यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरातून खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1 हजार 288 तर डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने 1 हजार 190 सदनिका उभारण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यापैकी बोऱ्हाडेवाडीतील 1 हजार 288 घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम आणि डुडूळगाव व प्राधिकरण सेक्टर-12 मधील प्रकल्पाचा भूमिपुजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पिंपरी चिंचवड शहरातील कचरा मोशी कचरा डेपो मध्ये टाकण्यात येत आहे. नागरिकांची दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे वीज निर्मिती होणार असून दुसरीकडे कचऱ्याचे डोंगर हटविण्यास देखील मदत होणार आहे. तसेच फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानकापर्यंत मेट्रो मार्गिकांचे उदघाटन देखील होणार असल्याने शहराच्या नावलौकिकात भर पडणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.