– महापौर मुरलीधर मोहोळ यांचा पुढाकार
– पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडे अडीच हजार किट सुपूर्त
पुणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम विविध क्षेत्रावर झाला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्र व्यवसायालाही याचा फटका बसला आहे. यामुळे घरोघरी वृत्तपत्र टाकून उदरनिर्वाह करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे निर्माते आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी शहरातील अडीच हजार वृत्तपत्र विक्रेत्यांना शिधा वाटप केला.
पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी बद्दल पुनीत बालन यांना माहिती दिली असता बालन यांनी तत्काळ पुढाकार घेत ही मदत दिली. एका कुटुंबाला १० ते १५ दिवस पुरेल एवढा शिधा असलेल्या अडीच हजार किट पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, पुनीत बालन, इंद्राणी बालन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा जान्हवी आर. धारीवाल, संतोष शहा, सनी मारवाडी, लीड मीडियाचे विनोद सातव, पुणे वृतपत्र विक्रेते संघटनेचे सहसचिव अतुल पारगे, संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना पुनित बालन म्हणाले, काही दिवसांपूर्वी आम्ही चित्रपट, नाट्य क्षेत्रातील ४५० पेक्षा अधिक पडद्यामागील कामगारांना आणि काही तमाशा कलावंत गटांना मदत केली. आज महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत केली आहे.
यावेळी बोलताना जान्हवी आर. धारीवाल म्हणाल्या, कोरोनाचे हे संकट भयानक आहे अशा प्रसंगी समाजाच्या पाठीशी उभे राहणे आमचे कर्तव्य आहे. हे संकट फार काळ टिकू नये पण दुर्दैवाने अजून काही काळ टिकले आणि भविष्यात आमची मदत लागली तर ती देण्याची आमची तयारी आहे.
विजय पारगे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सोसायट्या मध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. आम्हाला वाचकांकडून मागील महिन्याचे बील आम्हाला मिळू शकलेले नाही, यामुळे आम्ही अडचणीत सापडलो आहोत. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी माझे यासंदर्भात बोलणे झाले होते, महापौरांनी बालन यांना आमची समस्या सांगितली आणि बालन साहेबांनी तत्काळ अडीच हजार लोकांना मदत दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.