बीसीसीआयकडून अधिकृत शिक्कामोर्तब
मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हरप्रकारे प्रयत्न करुनही स्पर्धा खेळविण्यासाठी कोणतीच विंडो मिळत नसल्याने अखेर यंदाची इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) पुढील आदेश येइपर्यंत अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकल्याचे मंडळाचे सचिव जय शहा यांनी गुरूवारी अधिकृतरीत्या जाहीर केले आहे.
करोनाचा धोका वाढल्याने 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, करोनाचा धोका कायम राहिल्याने अखेर ही स्पर्धा पुढील आदेश येइपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता एकूण परिस्थितीचा आढवा घेतल्यानंतरच याबाबत विचार केला जाईल.
ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली तरच या वर्षी आयपीएल खेळविण्यासाठी विंडो उपलब्ध होऊ शकेल मात्र सध्यातरी याबाबत काही बोलणे योग्य नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले आहे. स्पर्धेतील सहभागी खेळाडू, संघ मालक, प्रायोजक, मुख्य प्रक्षेपण करणारी दूरचित्रवाणी वाहिनी यांना या निर्णयापूर्वी माहिती देण्यात आली होती व त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच हा निर्णय जाहीर केला असल्याचेही शहा यांनी सांगितले.