पिंपरी – सांगवी येथे एमएनजीएलच्या पाइपलाइनचे काम करताना निष्काळजीपणामुळे आग लागून चार वाहने जळून खाक झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगवी येथे 11 मे रोजी घडली.
दत्तात्रय गुंडू (रा. अभिजित पार्क, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ज्ञानेश्वर किसन हुलावळे (वय 49 रा. रामनगर, पिंपळे गुरव) यांनी मंगळवारी (दि. 18) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथील शितोळे शाळेसमोर एमएनजीएलची पाईपलाईन लीकेज झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी आरोपी दत्तात्रय गुंडू यांनी काम करताना कोणतीही सुरक्षेबाबत उपाययोजना केली नाही. यामुळे त्या ठिकाणाहून ठिणगी उडून आग लागली. या आगीत फिर्यादी हुलावळे यांची मोटार (एमएच 14 ईपी 8856) व इतर तीन मोटारी पूर्णपणे जळून खाक झाल्या. तसेच एका तसेच एका मोटारीचे किरकोळ नुकसान झाले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एच. येडे या बाबत अधिक तपास करीत आहेत.