मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. दरम्यान, तारक मेहता… मधील लोकप्रिय पात्र म्हणजेच बबीताजी अर्थात अभिनेत्री ‘मुनमुन दत्ता’ अडचणीत सापडली आहे. अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच मुनमुनने जातीवाचक शब्दांचा उल्लेख करत अपमानजनक वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य मुनमुनला आता महागात पडलं आहे. मुनमुनने सोशल मीडियावर एक व्हि़डीओ शेअर केला होता. आणि याच व्हिडीओमुळे या प्रकरणाला तोंड फुटलं.
या प्रकरणी आता अंबोली पोलीस स्टेशनमध्ये मुनमुन दत्ताच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम (अॅट्रोसिटी अॅक्ट) 2015 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नसून देशातील अन्य राज्यांमध्ये देखील मुनमुन विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जालंधरमध्ये दलित संघटनांनी एकत्र येत मुनमुनविरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरात लवकर तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता अभिनेत्री ‘मुनमुन दत्ता’च्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
काय म्हणाली मुनमुन आपल्या व्हिडिओ मध्ये…
शेअर केलेल्या व्हिडीओत ती म्हणाली.. “मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचं आहे. मला ** सारखं दिसायचे नाही’. आणि तिचा हाच व्हि़डीओ पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळी.