पहिल्याच रिमांडमध्ये केला ऍट्रॉसिटीचा गुन्हा रद्द
पुणे – “प्रथमदर्शनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा लागू होत नाही,’ असे निरीक्षण नोंदवत पहिल्याच रिमांडवेळी व्यावसायिकावर दाखल असलेला ऍट्रॉसिटीचा गुन्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. आर. वाघमारे यांनी रद्द केला. तसेच पुढील सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात घ्यावी, असे आदेश दिले.
ऍट्रॉसिटीचा वापर करीत खोटे गुन्हा दाखल केल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे याचा गैरवापर करणाऱ्यांना हा आदेश मोठी चपराक ठरणार आहे. सुरक्षारक्षक सुधाकर खुडे यांनी लोणीकंद पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार समीर सतपालसिंह चरख यांच्याविरोधात फसवणूक आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुडे यांनी चरख यांच्याकडून लोणीकंदमधील शिंदेवाडी परिसरात सुमारे साडेसहा लाख रुपयांचे दोन प्लॉट खरेदी केले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही त्यांनी खरेदीखत बनवून दिले नाही, असे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, “चरख यांनी संबंधित प्लॉट दुसऱ्याला विकून तुमचे पैसे परत करतो,’ असे आश्वासन खुडे यांना दिले. त्यासाठी दोन चेक चरख यांनी दिले. मात्र ते दोनदा बाऊंस झाले. त्यामुळे खुडे यांनी तक्रार दिली. पोलिसांनी अटक केल्यानंतर चरख यांना गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी बचाव पक्षाचे वकील सचिन ठोंबरे यांनी युक्तिवाद केला, की “समोरच्या व्यक्तीला त्रास देण्याच्या दृष्टीने ऍट्रॉसिटीचा वापर केल्याची अनेक उदाहरणे आहेत. या प्रकरणात स्पष्ट दिसून येते की चरख यांच्यावर ऍट्रॉसिटी लागू होत नाही.’ त्यावर बाजू लक्षात घेत न्यायालयाने “या प्रकरणात प्रथमदर्शनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा लागू होत नाही,’ असा आदेश दिला.
दरम्यान, हे प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे पाठविण्यात आले होते. संबंधित न्यायालयाने चरख यांना
17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.