मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील एक वकील संतोष दुबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी मुलुंड पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. एका न्युज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी संघाची बदनामी करणारी वक्तव्ये केल्याने त्यांच्या विरोधात तक्रारदाराने बदनामीची नोटीसही जारी केली आहे.
त्यात त्यांनी अख्तर यांच्याकडे माफीची मागणी केली आहे. या मुलाखतीत अख्तर यांनी संघाची तुलना तालिबानशी केली होती. संघ आणि तालिबान या दोन्हीं संघटना धार्मिक कट्टरपंथीय संघटना असल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे. या प्रकरणात त्यांनी माफी मागितलीच पाहिजे अशी दुबे यांची भूमिका आहे.