पुणे – बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायलेंट झोनमध्ये लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा तसेच आयोजन आणि परवानगी देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी युवा सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. येथे होणाऱ्या कॉन्सर्ट संदर्भात अगोदरही स्थानिक नागरिकांडून अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.
युवा सेनेचे शहर प्रमुख सनी गवते यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सांगितले की टू. बी. एच. के क्लब यांनी आज कपिल शर्मा व दि.२४ डिसेंबर रोजी सुनिधी चव्हाण यांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्थळ टू. बी. एच. के. क्लब राजाबहादुर सिटी सेंटर, नायडू हॉस्पिटलजवळ आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणा पासून हाकेच्या अंतरावर सार्वजनिक सरकारी नायडू हॉस्पिटल हे आहे.
त्यामुळे सदरचा परिसर हा सायलेंट ट झोन (शांतता क्षेत्र) अंतर्गत येतो. अशा सायलेंट झोन (शांतता क्षेत्र) जवळील जागेस परवानगी दिल्यास शांतता क्षेत्राचा भंग होत आहे. या लाईव्ह कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साउंड स्पीकरची थप्पी एकावर एक लावण्यात येते व या साउंडच्या मोठ्या व कर्कश आवाजामुळे सरकारी नायडू हॉस्पिटलमधील एखाद्या रूग्णाला त्रास होऊन ही दगावण्याची भिती आहे. या क्षेत्राला लागून हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमी तसेच दाट लोकवस्ती हे.
या वस्तीमध्ये १०वी आणि १२वी बोर्डाचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. आताच्या परिक्षेच्या कालावधीमध्ये अशा विद्याथ्यांना या कर्कश आवाजामुळे आभ्यासामध्ये व्यत्यय होऊ शकतो.या कार्यक्रमाला क्षमतेपेक्षा जास्त लोक आल्यास कदाचित वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते.
कारण जवळच पुणे रेल्वे स्टेशन येथून वाहतुक करणाऱ्या प्रवासी लोकांची वाहतुक देखील जास्त प्रमाणात होत असते. येथे संगीतकार ए.आर.रहमान यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दहाच्या ठोक्याला स्टेजवर जात रहमान यांचा कार्यक्रम थांबवला होता. यामुळे पोलिसांवर समाजमाध्यमातून टीक झाली होती. मात्र पोलिसांनी नियम सगळ्यांना सारखेच असे सांगत कारवाईचे समर्थन केले होते. दरम्यान आयोजकांनी कार्यक्रमाची परवानगी थेट मुंबईतून आणण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.