केतकावळे – पुरंदर तालुक्यातील बापदेव घाटाच्या तोंडाशी 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे गायीचे व बैलासारखे मुंडके असलेले अंदाजे 600 किलो वजनाचे मांस, 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचा टेम्पो असा मिळून 3 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सासवड पोलीस ठाण्याच्या वतीने जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल राजीव सापळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
गाडी चालक शहीद साबिर कुरेशी (वय 29) आणि समीर सलीम (वय 18, रा. कुरेशीनगर, कुर्ला, मुंबई) या दोघांना अटक करण्यात आली आहे. सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील भिवरी गावच्या हद्दीमध्ये बापदेव येथे घाट माथ्यावर पोलीस निरीक्षक डी. एस. हाके आणि रात्रगस्त अधिकारी राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राजीव सापळे यांच्यासह होमगार्ड जवान काकडे आणि वलटे हे नाकाबंदी करीत होते.
दरम्यान वेळी शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास वाहन तपासणी करीत असताना एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो सासवडकडून मुंबईकडे जात होता. त्यांच्याकडे कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा पास मिळून न आल्याने गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये फळाचे कॅरेट व त्याच्या खाली मांस असल्याचे दिसले. यावेळी किमान 600 किलो वजनाचे सुमारे 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे गोमांस आढळून आले. मांस हे फलटण कडून कुर्ला, मुंबई येथे नेत असल्याचे समजले