एकनाथ रानडे 

स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे निर्माते स्व. एकनाथ रानडे यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचे निधन 22 ऑगस्ट 1982 रोजी चेन्नई येथे झाले. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील टिमटिला या गावात 19 नोव्हेंबर 1914 रोजी झाला. शिक्षणासाठी थोरल्या भावाकडे ते नागपूर येथे आले. तेथे शालेय शिक्षण चालू असताना त्यांची डॉ. हेडगेवार यांच्याशी भेट झाली. ते त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले. त्यांची संघकार्यात पूर्ण वेळ वाहून घ्यायची तयारी होती. तथापि, डॉक्‍टरांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. बी. ए. ऑनर्सची पदवी प्राप्त झाल्यावर ते संघ प्रचारक म्हणून 1938 साली महाकोशल भागात जबलपूरला गेले. त्यांनी ब्रह्मचर्य पत्करले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा प्रचार करू लागले.
मध्य प्रदेशात संघ प्रचारक म्हणून काम करत असतानाच तेथील वास्तव्यात असताना त्यांनी डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ (सागर विद्यापीठ) मधून तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1938 ते 1962 म्हणजे 23 वर्षे संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून एकनाथ यांनी कार्य केले. 1962 मध्ये कन्याकुमारीतील लोकांनी स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दीचे (1963) औचित्य साधून, स्वामी विवेकानंदांनी ज्या शिलेवर ध्यान केले तेथे स्मारक करावे असे ठरविले. त्या वेळी चेन्नईच्या रामकृष्ण मिशनचे प्रमुख स्वामी शुद्धतत्त्वानंद यांच्याही मनात स्मारक करावे असा विचार आला.

केरळमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री. मन्नाथ पद्मनाभन यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी येथे विवेकानंद रॉक मेमोरियल कमिटीची स्थापना करण्यात आली. श्री. पद्मनाभन यांनी संघाचे सहकार्य मागितले आणि श्री गुरुजींनी एकनाथ यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. दिल्लीला जाऊन 232 खासदारांच्या सह्या घेऊन एक निवेदन त्यांनी बापूजी अणे व लालबहादूर शास्त्रींजवळ दिले. तत्कालीन केंद्रीय कायदामंत्री पी. गोविंद मेनन यांनी एकनाथ यांना भेटीला बोलावले व त्यांच्याकडून स्मारकाची माहिती घेतली, त्यांच्या शंका त्यांनी दूर केल्या व स्मारकाचा मार्ग मोकळा झाला. कॉंग्रेस सरकार असूनही एकनाथ यांच्यासारख्या संघ स्वयंसेवकाला स्मारकनिर्मितीसाठी पूर्ण सहकार्य दिले गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकनाथ यांचे विचार ऐकण्याची संधी वाई येथे पाटबंधारे वसाहतीत माझे स्नेही अनिल वाळिंबे यांच्या निवासी मला मिळाली. अत्यंत निगर्वी व्यक्‍तिमत्त्व बघण्याचे भाग्य मिळाले. त्यावेळी त्यांनी सांगितले, त्यांना भारत सरकारने या कामासाठी संपूर्ण भारतात विमानाने व रेल्वेने कोठेही मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली होती. परंतु महत्त्वाच्या कामाशिवाय त्यांनी त्याचा वापर केला नाही. त्यांनी फक्‍त एक इशारा सर्व कार्यकर्त्यांना आवर्जून दिला. तो म्हणजे, हे काम करीत असताना राजकारणाच्या चपला दूर ठेवा. शुद्ध अंतःकरणाने गाभाऱ्यात प्रवेश करा आणि हे काम तडीस न्या. शिला स्मारकाच्या कामात आलेले असंख्य अडथळे कसे दूर केले हे त्यांनीच विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रतींसमोर स्वतः निवेदन केले. त्या जिवंत अनुभवाचे “कथा शिलास्मारकाची’ हे पुस्तक उपलब्ध आहे. आज शिलास्मारक लोकांच्या श्रद्धेचा तसेच पर्यटनाचा भारतातील मानबिंदू ठरला आहे. महान कार्यधुरिणांस अभिवादन.

माधव विद्वांस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)