बगदाद – इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कधिमी यांच्या घरावर आज ड्रोन हल्ला करण्यात आला. तथापि या हल्ल्यातून ते सुखरूपपणे बचावले असून त्यांना यात कोणतीही इजा झालेली नाही. इराक मध्ये निवडणूक निकालावरून जोरदार तणाव निर्माण झाला आहे. इराणच्या पाठिंब्यावर इराकमध्ये सक्रिय असलेल्या गनिमी संघटनांनी गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीचे निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे.
दरम्यान इराकी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर जो ड्रोन हल्ला झाला त्यात तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेले सात जवान जखमी झाले आहेत. तेथे एकूण दोन ड्रोन हल्ले झाले आहेत. दरम्यान पंतप्रधानांनी आपण सुखरूप असल्याचा संदेश आपल देशवासियांना जारी केला आहे. या प्रकारच्या हल्ल्यांमुळे लोकांनी अस्वस्थ होऊ नये त्यांनी शांतता आणि संयम बाळगावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पंतप्रधानांचे निवासस्थात अति सुरक्षित विभागात आहे.
परंतु तरीही तेथे अशा प्रकारचा हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांनी तेथील सुरक्षेचा फेरआढावा सुरू केला आहे. इराण समर्थक शिया गनिमांच्या पाठिंब्यावर जे उमेदवार उभे होते, त्यातील बहुतेक उमेदवार पराभूत झाले असून त्यांना जो मोठा पराभवाचा फटका बसला आहे, त्यातून त्यांनी इराकमध्ये हे हिंसक प्रकार सुरू केले आहेत असे सांगण्यात येते.