नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) आपल्या सर्व बचत खात्यावरील व्याजदरात 0.25 टक्के कपात करत तो 2.75 टक्के इतका केला आहे. यामुळे बॅंकेच्या सुमारे 44.51 कोटी खातेदारांना फटका बसणार आह. यापुर्वी एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम असल्यास खातेदारांना 3 टक्के व्याज मिळत होते. दरम्यान, बॅंकेचे हे नवीन दर 15 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.
एसबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनामुळे सर्व स्तरावर त्याच्या परिणाम झाला असुन पर्याप्त रोख रक्कम उपलब्ध राहण्यासाठी एसबीआयने 15 एप्रिलपासून बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एक लाखांपर्यत जमा असलेल्या खात्यांवर 3 टक्क्यांऐवजी आता 2.75 टक्क व्याज मिळणार आहे. तसेच एका लाखाहून अधिक रक्कम असल्याचही हा व्याजदर मिळणार आहे, अशी माहिती संबंधितांनी दिली.
दरम्यान, एसबीआयने गेल्या महिन्यातही सर्व बचत खात्यांवरील व्याजदर कमी करून 3% केले होते. तसेच बॅंकेने सर्व मॅच्युरिटी कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 0.35% कपात केली आहे. या वजावटीनंतर एक वर्षाचा एमसीएलआर 7.75% वरून 7.40%वर आला आहे. जो 10 एप्रिल 2020पासून अंमलात येईल. यामुळे 30 वर्षांच्या गृह कर्जाची मासिक हप्ता कमी होईल.
ताज्या दराच्या कपातीनंतर आता सात ते 45 दिवसांच्या एफडीला 3.5% व्याज मिळेल. 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.5% व्याजदर मिळेल. 180दिवसांपासून एक वर्षाची एफडी केल्यास 5% व्याजदर उपलब्ध असेल. 1 वर्षापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीसाठी 5.7% व्याजदर मिळेल. तसेच नवीन व्याजदरानुसार ज्येष्ठ नागरिकांना सात दिवस ते दहा वर्षांपर्यंतच्या एफडीवर 4% ते 6% व्याज मिळेल.