शिक्रापूर – वरुडे (ता. शिरूर) येथे उसन्या पैशाच्या देवाणघेवाणीतून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का दिलास, या रागातून दाम्पत्याने एकावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी भरत ज्ञानेश्वर तांबे (रा. वरुडे, ता. शिरूर; सध्या रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
पोलिसांनी रामदास गायकवाड व त्यांची पत्नी (नाव माहित नाही) (दोघे रा. वरुडे) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. भरत तांबे यांनी गावातील रामदास गायकवाड यांच्याकडून एक वर्षापूर्वी काही पैसे उसने घेतले होते. ते सहा महिन्यांपूर्वी परत दिले असताना गायकवाड हे तांबे यांना माझे तुझ्याकडे पैसे आहेत, असे म्हणून मारण्याची धमकी देत होते.
याबाबत तांबे यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी दोघांना समज दिली होती. तरीही गुरुवारी सायंकाळी गायकवाड व पत्नी यांनी तांबे यांना मारहाण केली.