गुंडगिरीचा बंदोबस्त करण्याची चेंबरची मागणी
पिंपरी – दोन महिने बंद असलेले उद्योग सुरु होऊन एक आठवडाही पूर्ण होत नाही, तोवर उद्योजकांना स्थानिक माथाडी नेते आणि गुंडांच्या माध्यमातून धमक्या मिळू लागल्या आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत उद्योजकांना होत असलेला त्रास थांबवावा आणि नेते बनून हिंडत असलेल्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज ऍण्ड कॉमर्स या औद्योगिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
चेंबरने म्हटले आहे की, चाकण, पिंपरी चिंचवड, मावळ एमआयडीसी परिसरातील उद्योजक व कामगारांना आता काही पुढारी व पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने कामगार संघटना व माथाडी संघटनांच्या सांघिक एकजुटीतून थेट धमक्या मिळू लागल्या आहेत. आमच्या सल्ल्यानेच कारखाने चालवा, आमचे कामगार घ्या व जे नेहमीचे कामगार आहेत त्यांना आमच्या कामगार संघटनेतून, एजन्सीतर्फे कामावर यावे लागेल, अशा धमक्यांचे फोन मालक व कामगारांना केले जात आहेत. धमक्या देणारे पुढारी हे शासन दरबारी वजन असलेले सर्वपक्षीय आहेत.
“करोना’च्या संकटकाळात मदत करण्यापेक्षा उद्योजक आणि कामगारांना धमकावून पैसे उकळण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. उद्योजक व कामगारांचे मनोधैर्य खचत असून पुढील काही काळासाठी कारखाने बंद ठेवण्याचा विचार उद्योजक करत असल्याचा इशाराही चेंबरने दिला आहे. उद्योजक सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीतही पुढारी आताही पूर्वीप्रमाणेच उद्योजकांकडून खंडणी व कामगार तुटीचा गैर फायदा अशा दुहेरी पद्धतीतून बेनामी पैसे कमावू पाहत आहेत.
उद्योजकांनी दोन महिन्यांनंतर आपले कारखाने सुरु केल्याने दुरुस्ती, कामगार खर्च, कच्चा माल खरेदी असे मोठे खर्च उद्योजकांसमोर असताना गुंड प्रवृत्तीचे पुढारी उद्योजकांना त्रास देत आहेत. यांचे वर्तन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरण विरोधी समजून तातडीने त्यांची धरपकड करावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ही चेंबरच्या वतीने करण्यात आली आहे.