पुणे – फिडे मास्टर सोहन फडके व गौरव हगवणे यांनी खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेतील अनुक्रमे मानांकन व बिगरमानांकन गटात अजिंक्यपद पटकाविले. ही स्पर्धा सिम्बायोसिस क्रीडा केंद्रात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टने आयोजित केली होती.
स्पर्धेतील मानांकन गटात सातव्या फेरीअखेर सोहनने साडेसहा गुणांची कमाई केली. शेवटच्या फेरीत त्याने विकास शर्माला पराभूत केले. ऋषभ गोखले व अर्णव नानल यांचे प्रत्येकी सहा गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक देण्यात आला. विकासला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. केवल निर्गुण, साहिल शेजाळ, हिमांशु छाब्रा, अखिलेश नागरे, ओंकार देशपांडे व पद्मानंद मेनन यांनी अनुक्रमे 5 ते 10 क्रमांक मिळाले.
बिगरमानांकन गटात गौरव व नरहरी नाटेकर यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी चुरस झाली. त्यांचे प्रत्येकी साडेसहा गुण झाले. त्यामुळे प्रगत गुणांकन पद्धतीचा उपयोग करण्यात आला. त्यामध्ये गौरवला पहिले तर नरहरीला दुसरे स्थान मिळाले. अभय होनमाने याला तिसरा क्रमांक मिळाला. त्याने सहा गुण घेतले. अक्षय कार्लेने 5.5 गुणांसह चौथा क्रमांक मिळविला. सागर कोल्हे, गिरीश दुगले, वैभव जोशी, अनिल शर्मा, शंकर जाधव व आयुष चौधरी हे अनुक्रमे 5 ते 10 क्रमांकांचे मानकरी ठरले.
ज्येष्ठ खेळाडूंच्या गटात गिरीश जोशी व रवी बेहेरे यांनी अनुक्रमे पहिली दोन पारितोषिके घेतली तर महिलांमध्ये हा मान अनुक्रमे आदिती कयाळ व अनुया रॉय यांना मिळाला. अन्य विविध गटात प्रज्वल आव्हाड, विहान दावडा, विशाल शेवाळे, चिन्मय कुलकर्णी, आर्यन राव, ईशान वरूडकर, सुरेश जगताप, अरूण उदगीर, गायत्री शितोळे, सलोनी भंडारी, ईशान वैद्य व शुभंकर खिस्ती यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. बक्षीस समारंभ ज्येष्ठ संघटक रवींद्र अकोलकर, प्रकाश कुंटे, विनिता श्रोत्री यांच्या हस्ते झाला.