मुंबई – निर्मिती गजभिये हिने शानदार विजय मिळवित मुंबई जिमखाना आयोजित सब ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या 13 वर्षाखालील एकेरी व मुलींच्या 15 वर्षाखालील एकेरी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. मुंबई महानगर बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा मुंबई जिमखाना बॅडमिंटन कोर्टसवर सुरू आहे.
मुलींच्या 13 वर्षाखालील गटात अव्वल मानांकित निर्मितीने एवाना त्यागीला 15-6, 15-7 असे पराभूत केले. अन्य एका उपांत्यफेरीत दुसऱ्या मानांकित रिया विन्हेरकरने सानिका सिन्हाला 15-12, 15-4 असे नमविले. यानंतर निर्मितीने मुलीच्या 15 वर्षाखालील गटात संजीवनी सूर्यवंशीला 15-3, 15-9 असे हरविले. तर, दुसऱ्या मानांकित कामया रवी हिने तारुषी यादव हिचा 15-4, 15-5 असा पराभव केला. मुलींच्या 11 वर्षाखालील गटात रिया विन्हेरकरने आरोही मेजारी हिला 15-5, 15-1 असे नमविले. तर, दुसऱ्या मानांकित एवाना त्यागीने दुसऱ्या मानांकित मायरा ओकचा 15-6, 15-7 असा पराभव केला.
मुलांच्या 15 वर्षाखालील गटात प्रणव कांबळे व अक्षित किरण यांच्यातील सामना प्रणवने जिंकला. प्रणवकडे 14-15, 15-8, 8-2 अशी आघाडी असताना किरणने सामन्यातून माघार घेतली.दुसऱ्या उपांत्य फेरीत लॉयनल मोंटेरिओ याने शिवान मिश्रा याच्यावर 10-15, 15-11, 15-7 असा विजय नोंदविला.
अन्य निकाल – 13 वर्षाखालील मुले एकेरी (उपांत्यफेरी) – प्रणित सोमाणी वि. वि. ओंकार मॅथ्यु 13-15, 15-8, 15-11 , शाश्वत कुमार वि. वि. आर्यन तलवार 15-11, 15-10.