श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या फारुख अब्दुल्ला यांना आज मोठा दिलासा मिळाला. अब्दुल्ला यांची आज स्थानबद्धतेतून मुक्तता करण्यात आली असून त्यांना गतवर्षी ५ ऑगस्टपासून ताब्यात ठेवण्यात आले होते. फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाचे रुपांतर सबजेलमध्ये करून त्यांना त्यांच्याच घरामध्ये स्थानबद्ध ठेवण्यात आलेले.
अब्दुल्ला यांना सामाजिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले होते. यामुळे सामाजिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आलेले फारुख अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले होते.
या कायद्यानुसार कोणत्याही खटल्याशिवाय एक वर्षापर्यंत स्थानबद्ध करण्याची तरतूद आहे. ही मुदत संपल्यवर दोन वर्षांपर्यंत स्थानबद्ध केले जाऊ शकते. सामाजिक सुरक्षा कायद हा केवळ जम्मू काश्मीरमध्येच लागू आहे. देशात अन्यत्र हा कायदा राष्ट्रीय सुरक्षा कायदा या नावाने ओळखला जातो.
अब्दुल्ला यांच्याव्यतिरिक्त त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अन्य काही नेत्यांनाही 5 ऑगस्टपासून स्थानबद्ध करण्यात आले आहे.