चंदीगड – शेतमालाला किमान आधारभूत किंमतीसह विविध मागण्यांसाठी देशव्यापी चार तासांचे ‘रेल रोको’ आंदोलन रविवारी करण्यात आले. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका पंजाबला बसला असून अन्य राज्यांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.
संयुक्त किसान मोर्चाआणि किसान मजदूर मोर्चाने पुकारलेले किमान आधारभूत किंमतच्या कायदेशीर हमीसह विविध मागण्याबाबत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले.
पंजाबमध्ये, अमृतसर, लुधियाना, तरन तारण, होशियारपूर, फिरोजपूर, फाजिल्का, संगरूर, मानसा, मोगा आणि भटिंडा यासह 22 जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी शेतकरी रेल्वे रुळांवर बसले. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फिरोजपूर ते भटिंडा, जालंधर सिटी ते होशियारपूर आणि जालंधर सिटी ते पठाणकोट यासह नऊ गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
त्यांचे ‘रेल रोको’ आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर आणि जगजित सिंग डल्लेवाल यांनी केला. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय देत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष सुरूच ठेवणार आहोत, असे पंढेर म्हणाले.
पंजाबमध्ये 75 ठिकाणी, हरियाणामध्ये पाच, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन आणि तामिळनाडूमध्ये 20 ठिकाणी ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी मागण्या मान्य न केल्याने केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.