Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीच्या तारखा या येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळे आता लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, शनिवारी मुख्य निवडणूक आयोगातील आयुक्त अरुण गोयल यांनी अचानकपणे राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
यामुळे आता मुख्य निवडणूक आयोगात केवळ एकच आयुक्त राहिले आहेत. राजीव कुमार हे सध्या केंद्रीय निवडणूक आयोगातील एकमेव आयुक्त असल्याने त्यांच्याच खांद्यावर देशातील लोकसभा निवडणुकांची धुरा राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अरुण गोयल यांनी शनिवारी अचानकच आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्यांचा राजीनामा मंजूर केला. त्यामुळे आता मुख्य निवडणूक आयोगात केवळ एकच आयुक्त राहिले आहेत. कारण अरुण गोयल यांच्या आधी अनुप चंद्र पांडे यांची निवृत्ती झाली, त्यामुळे ती जागा आधीच रिक्त होती.
परंतु, आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामुळे मुख्य निवडणूक आयोगात दोन आयुक्तांची पदे रिक्त झालेली आहेत. ज्यामुळे आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना लोकसभा निवडणुकीची धुरा एकट्यानेच सांभाळावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
आगामी 18व्या लोकसभेसाठी प्रतिनिधींची निवड करायची आहे.
अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाकडून कधीही लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. पुढील आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर मात्र मोठा पेच असणार आहे.
कारण आयुक्त राजीव कुमार यांना एकट्यानेच हे सर्व कामकाज पाहावे लागणार आहे, सर्वसाधारणपणे निवडणूक आयोगात तीन निवडणूक आयुक्त असतात. मात्र आता दोन निवडणूक आयुक्तांच्या या रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे याबाबत आता नेमका कोणता निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.