Indian Premier League 2024, Delhi Capitals Squad & Rishabh Pant : – दुखापतीतून सावरला असला तरीही भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यंदाच्या आयपीएल स्पर्धेला मुकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तसेच बीसीसीआयकडून पंतला तंदुरुस्ती प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही.
गेल्या वर्षी त्याचा अपघात झाला होता. त्यापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. नुकताच त्याने सराव सुरु केला होता. तसेच आपण तंदुरुस्त होत असल्याचा संदेशही आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट केला होता. तसेच त्याने आपल्या सरावाचेही काही व्हिडीओ पोस्ट केले होते. मात्र, अद्याप त्याचा समावेश दिल्ली कॅपिटल्सने आपल्या खेळाडूंमध्ये केलेला नाही. त्याला जेव्हा तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मिळेल तेव्हाच त्याचा संघात समावेश करण्यात येणार असल्याचे दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे.
पंत यंदाची आयपीएल स्पर्धा खेळेल असे वर्तवले जात होते. मात्र, तो दिल्लीचे नेतृत्व करणार नसून केवळ एक खेळाडू म्हणूनच संघाचा भाग असेल असे संघ व्यवस्थापनाने म्हटले होते. आता यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सत्राला येत्या 22 मार्चपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे यापूर्वी त्याला हे प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे.