अंबाला – शंभू सीमेवर आंदोलन करणारे पंजाबचे शेतकरी उद्या (बुधवारी) दिल्लीला रवाना होणार आहेत. हरियाणा पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यासाठी जेसीबी आणि हायड्रोलिक क्रेनसारखी अवजड यंत्रसामग्री घेऊन शेतकरी येथे पोहोचले आहेत.
याशिवाय बुलेटप्रूफ पोकलेन मशीनही आणण्यात आले आहे. अश्रूधुराचाही त्यांच्यावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने त्यांची रचना करण्यात आली आहे.
केंद्राशी झालेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. केंद्राने कापूस, मका, मसूर, अरहर आणि उडीद या पाच पिकांवर एमएसपी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला. शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले की, आम्ही केंद्राच्या प्रस्तावावर तज्ञ आणि शेतकऱ्यांशी बोललो. त्यानंतर हा प्रस्ताव आमच्या हिताचा नसल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही आलो.
आमच्या एमएसपीवर हमी कायद्याची मागणी पूर्ण झाली पाहिजे. एमएसपी देण्यासाठी १.७५ लाख कोटी रुपयांची गरज नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील ७ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदीचा निर्णय २० फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे.