पाण्याअभावी जुन्नरमधील शेतकरी अडचणीत

महेंद्र मोजाड : अतुल बेनकेंच्या प्रचारार्थ आदिवासी भागात गावभेट दौरा

ओतूर – जुन्नर तालुक्‍यात धरण आहे, पण शेतकऱ्यांना पाणी नाही. पाण्याअभावी या पाच वर्षांत शेतकरीवर्ग अडचणीत आला असून पिंपळगाव जोगे धरणाचे पाणी राखण्यासाठी अतुल बेनके यांना विजयी करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोजाड यांनी सितेवाडी येथे केले.

जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या प्रचारानिमित्त आदिवासी भागातील कारंजाळे, खुबी, खिरेश्‍वर, लोहकरवाडी, भोहिरवाडी आदी गावात आयोजित गाव भेट दौऱ्याप्रसंगी सितेवाडी येथे मोजाड बोलत होते. यावेळी आनंद मोढवे, बुधाजी शिंगाडे, किसन सुपे, युवराज ढेंगळे, सुभाष जगताप, दिनेश जगताप, तुकाराम लाही, संदीप माळी, गणपत शेळके आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

महेंद्र मोजाड म्हणाले की, गेल्या तीन-चार वर्षांपासून पिंपळगाव जोगे धरणाचे पाणी खाली सोडण्यात आलेले आहे. पिंपळगाव जोगे धरणाच्या लगतची जी गावे आहेत यामध्ये आमचे गाव एक सितेवाडी आहे. धरणामधील मृतसाठा हा फक्‍त पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेला आहे, असे असताना देखील शासनाने व लोकप्रतिनिधींनी सर्व पाणी खाली सोडले आणि इतक्‍या वर्षात प्रथमच आम्हाला धरणाचा तळ पाहिला मिळाला आहे. आता तर नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी खाली पाणी सोडले नाहीतर बेड्या ठोकून पाणी खाली सोडू, असे सांगितले आहे. म्हणजे आमच्याकडे धरण असताना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रसंगी महाआघाडीचे उमेदवार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, तुळशीराम भोईर यांनी मतदारांशी संवाद साधला.

नागरिक, तरुण बेनके यांच्यासोबत
पिंपळगाव जोगे धरणाचे कार्यालय नगर जिल्ह्यातील आळकुटी (ता . पारनेर) या ठिकाणी नेले होते; परंतु अतुल बेनके यांनी आंदोलन करुन तीन शाखा कार्यालये परत आणली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या धरणाचे पाणी राखायचे असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे व सर्व तरुणांचे एकच मत झाले असून अतुल बेनके यांच्यासोबत राहून त्यांनाच विजयी करायचे असा निश्‍चय त्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.