बारामती, इंदापूरसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

बारामती उपविभागात प्रतिबंधात्मक तडीपारी, मोक्‍काअंतर्गत कारवाई

बारामती – बारामती उपविभागातील विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात. त्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी बारामती पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. उपविभागातील विविध गुन्ह्यांत असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक, तडीपारी, मोक्‍काअंगर्तत कारवाई करत निवडणुकीला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड मिळून जवळपास 1500 जणांचा ताफा बंदोबस्तासाठी असणार आहे. पेट्रोलिंगसाठी 36 पथके तयार करण्यात आले आहेत.

बारामती उपविभागात बारामती, इंदापूर या दोन विधानसभा मतदारसंघात 696 बूथ आहेत. यामध्ये 95 बारामती शहर, 122 बारामती तालुका, 150 वडगाव निंबाळकर, 163 इंदापूर, 35 भिगवण, 131 वालचंदनगरचा समावेश आहे. तर दोन्ही विधानसभा मतदारसंघात 20 बारामती, 15 इंदापूर संवेदनशील मतदार बुथचा समावेश आहे.

213 जणांवर तडीपार कारवाई
हाणामारी, जीवे मारण्याच्या प्रयत्न, खून यांसारख्या शरीरविषयक गुन्ह्यांसह मालमत्तेसंबंधीच्या गुन्ह्यांमध्येही सक्रिय असणाऱ्या सराईत, विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय राहून कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान निर्माण करणाऱ्या 213 जणांवर बारामती उपविभागातील हद्दीतील पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली. मात्र मतदानाच्या दिवशी मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यात आला आहे. या व्यतिरिक्‍त कलम 55, 56, 57 नुसार 22 जणांना सहा महिने तडीपार केले आहेत.

येथे होणार नाकाबंदी
सांगवी पूल (बारामती तालुका पोलीस ठाणे)
गुंजखेडा (वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे)
भवानीनगर (कारखान्यासमोर)
कळंब (इंदापूर)
सरडेवाडी टोलनाका (इंदापूर)
सराटी (इंदापूर)
कर्जत-जामखेड रोड (भिगवण)
पुणे – सोलापूर महामार्ग (इंदापूर)

असे असेल मनुष्यबळ
पोलीस कर्मचारी – 1017
पोलीस अधिकारी – 70
होमगार्ड – 400

पेट्रोलिंगसाठी 36 पथके तयार
मतदानादिवशी नागरिकांना त्यांचा मतदानाचा हक्‍क बजावताना कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी 36 पथके तयार केली आहेत. त्यामध्ये 16 बारामती विधानसभा मतदारसंघात तर 20 इंदापूर विधानसभा मतदारसंघात पथके काम करणार आहेत. त्यासाठी 36 पोलीस अधिकारी, 144 कर्मचारी, 72 होमगार्डची नेमणुका करण्यात आल्या आहेत. निवडणूक कालावधीत बारामती उपविभागात आठ ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. नाकेबंदी पथकात एक अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नाकाबंदीसाठी 32 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

1853 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
बारामती, इंदापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील 1853 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, म्हणून त्यांच्याकडून निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होणार नाही. वर्तणुकीबाबत या संदर्भातील लेखी हमीपत्रही घेण्यात आले आहे. त्यांच्यावर कलम 107, 109, 110, 149 अन्वये कारवाई करण्यात आल्याचे बारामती पोलिसांनी संगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)