जुन्नर : तालुक्यातील शिरोली खुर्द या ठिकाणी बिबट्याने चिमुरडीवर हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवार दि ११ रोजी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान घडली.
संस्कृती संजय कोळेकर (वय दीड वर्ष) असे या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. मेंढपाळ संजय कोळेकर यांनी शिरोली खुर्द येथील शेतकरी संपत केरू मोरे यांच्या शेतामध्ये मेंढरांचा वाडा लावला होता. त्यावेळी आज गुरुवारी पहाटे ५ दरम्यान मेंढपाळ झोपेत असताना बिबट्याने हल्ला करून या चिमुरड्या मुलीला शेतात ओढून नेले.
सदरबाब लक्षात येताच मेंढपाळाने आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना याबाबत कळवले. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक व रेस्क्यू टीमने शोध घेतला असता ८ वाजण्याच्या दरम्यान या चिमुरडीच्या मृतदेहाचे काही अवशेष सुभाष थोरात व विश्वास जाधव यांच्या उसाच्या शेताच्या बांधावर आढळून आले.
जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व पोलीस कर्मचारी तसेच वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेटली आहे.
दरम्यान, जुन्नर तालुक्यात वारंवार होणारे मानवी हल्ल्यांमुळे शेतकरी व नागरिक भयभयीत झाले आहे. वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतामधील पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे प्रशासनाने बिबट्यांचे होणारे मानवी हल्ल्यांची दक्षता घेऊन योग्य ती उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.