दसऱ्यासाठी झेंडूची मोठी लागवड होऊनही पावसाचा फटका
पुणे – दसऱ्यासाठी झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यानंतर मुसळधार पावसाने अपेक्षित दर मिळू शकला नाही; तर शेवंतीला 200 रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीत फूलबाजार पुन्हा उचल खाईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
राज्यात काही ठिकाणी दुष्काळी तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीची दाणादाण उडली होती. मात्र, 15 दिवसांत राज्याच्या दुष्काळी भागातही पावसाने हजेरी लावली आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर फुले जगविली. परिश्रमातून जगवलेल्या पिकांना मात्र भाव मिळत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे.
दसऱ्यानिमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड बाजारपेठेत फुलांना प्रतिकिलो 30 ते 50 रुपये भाव मिळाला. हा दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेकांनी फुलांची तोड केली नाही.
दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांकडून झेंडुची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. गेल्यावर्षी अपेक्षित दर न मिळाल्याने यंदा झेंडूकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, मुसळधार पावसाने मालाचा दर्जा खालावला. भीजलेल्या झेंडुची 30 रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. तर सुक्या झेंडुला 50 रुपये भाव मिळाला. मुसळधार पावसाचा झेंडू उत्पादकांना फटका बसला आहे.